प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
मोबाईल, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या डिजिटल युगातही अनेक ग्रामीण भागांमध्ये दवंडी पिटण्याची पारंपरिक पद्धत आजही कायम आहे. शासनाच्या विविध योजना, ग्रामसभा, धार्मिक उत्सव, आरोग्य मोहिमा, लसीकरण, पाणीपुरवठा, तसेच इतर महत्त्वाच्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दवंडीचा प्रभावी वापर केला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने दवंडी देणारा व्यक्ती गावातील प्रमुख रस्त्यांवरून फिरत ढोल वाजवत नागरिकांचे लक्ष वेधतो आणि मोठ्याने सूचना देतो. त्यामुळे मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्या नागरिकांपर्यंतही महत्त्वाची माहिती सहज पोहोचते.तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवादाची अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाली असली, तरी ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली दवंडीची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत दवंडीची ही पद्धत आजही ग्रामीण जनजीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.



