प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
भोर तालुक्यातील ऐतिहासिक राजगड येथे फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा बालेकिल्ल्याकडे जाताना अपघात झाला. अविनाश श्रावण बागुल (वय २५, रा. जळगाव) हे आपल्या कुटुंबासह राजगड दर्शनासाठी आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, बालेकिल्ल्याकडे जात असताना त्यांनी मुख्य रहदारीचा मार्ग सोडून चुकून दुसऱ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीच्या दिशेने घसरले. सुदैवाने ते खाली एका मोठ्या झाडाला अडकल्याने आणखी मोठी दुर्घटना टळली.मात्र या अपघातात अविनाश बागुल यांच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले असून मान व पायालाही गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला पाचारण केले.रेस्क्यू पथकाने अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जखमी तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पोलीस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे गड-दुर्ग भटकंती करताना अधिकृत मार्गाचाच वापर करावा, धोकादायक वाटांवर जाणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



