प्रतिनिधी: श्री.सचिन शिंदे ( ता.शिरूर,पुणे )
शिरूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेतकरी सेनेच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी व तहसीलदार श्री. बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून निर्वी गावाच्या हद्दीत चासकमान कालव्यालगत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र गंगाराम जेंगवले (वय ५०, रा. चिंचणी, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

जितेंद्र यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “मी माझ्या कुटुंबाची गुजराण करत असताना काळ्या आईची मनापासून सेवा केली; मात्र लहरी निसर्गाचा वेगवेळी मला फटका बसला. मी मोठे भांडवल शेतीत ओतत राहिलो; मात्र माझ्या हातात कधीच नफा मिळाला नाही. माझी लेक लग्नाला आली असून सर्व बाजूंनी मी आर्थिक अडचणीत आहे. डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत आहे. बाळांनो काय करू, तुमचा बाप हतबल आहे, मला माफ करा. मला जगायचं होतं, पण या कर्जाने मला उद्ध्वस्त केलं,” असा आशय आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली असून पोलिसांनीही यास दुजोरा दिला आहे.
नापिकी, दूध व्यवसायातील तोटा तसेच खासगी आणि बँकांचे वाढते कर्ज या सर्व परिस्थितींमुळे जितेंद्र हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
तरी सदर शेतकरी कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील यांनी केली.
यावेळी ॲड. संदीप शिंदे (सामाजिक कार्यकर्ते), गोरख पवार, शहाजी पवार, बापू पवार, सचिन शिंदे, प्रशांत साळवे आदी उपस्थित होते.



