प्रतिनिधी : प्रशांत साळवे, ( तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे )
शिरूर (पुणे):
प्रेमविवाह केलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येथील युवक निखिल संदीप इचके याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (SHRC) गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने याप्रकरणी अधिकृत केस क्रमांक ३१८६/१३/२३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निखिलचा मृत्यू हा साधा रस्ता अपघात नसून, ऑनर किलिंग सदृश पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप त्याच्या माता-पित्याने केला आहे. स्थानिक पोलीस आणि यंत्रणा सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याने पालकांनी थेट मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे SIT किंवा CBI चौकशीची मागणी केली होती. पोलिसांकडून दाद न मिळाल्याने अखेर पालकांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती, ज्याची आयोगाने तात्काळ नोंद घेतली आहे.
काय आहे पालकांचा आरोप?
धमक्या व छळ: निखिलच्या विवाहाला मुलीच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. मुलीला जबरदस्तीने माहेरी नेऊन, “त्याला जिवंत ठेवणार नाही,” अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. मुलीने फोन करून “मी दोन महिन्यांची गर्भवती असून माझा छळ होत आहे,” असे निखिलला सांगितले होते.
संशयास्पद अपघात: कथित अपघात मुलीच्या माहेरच्या गावाजवळ झाला. अपघाताच्या वेळी सोबत असलेल्या मित्राला साधी खरचटही आली नाही आणि तो सध्या प्रचंड भयभीत आहे.
पुरावे नष्ट करणे: निखिलच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांत त्याचा मोबाईलमधील व्हॉट्सॲप डेटा डिलीट करण्यात आला. स्थानिक पोलीस ठाण्याकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, CCTV आणि कॉल डिटेल्स तपासण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.


१५ दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा!
“आम्ही आमचा एकुलता एक मुलगा गमावला आहे. भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि संशयित आरोपींवर १५ दिवसांच्या आत गुन्हे दाखल न झाल्यास, आम्ही पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पुणे यांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू” असा थेट इशारा मयत निखिलची आई जनाबाई इचके व वडील संदीप इचके यांनी दिला आहे.
मानवाधिकार आयोगाच्या या थेट हस्तक्षेपामुळे आता स्थानिक पोलिसांना या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावाच लागणार असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



