प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
शिंदोडी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेसाठी तात्काळ दोन कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गट विकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १७० असून त्यापैकी २२ विद्यार्थी आधार ओळख नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहेत.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत आणि घटनात्मक हक्क असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर असा अन्याय होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच शासन, शिक्षण विभाग व लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शिंदोडी येथे किमान दोन कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नको… शिक्षक द्या, शिक्षण वाचवा!” असा संदेशही देण्यात आला आहे,मागणीची दखल न घेतल्यास १५ जुलै २०२६ पासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.शिक्षकांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी इतर शाळांकडे वळत असून ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे श्री.योगेश पाटील, शेतकरीसेना तालुकाप्रमुख, शिरूर यांनी सांगितले. यावेळी ॲड.संदीप शिंदे उपस्थित होते.



