प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
भोर नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय अमृतदादा रावळ यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘स्व. अमृतदादा रावळ स्मृती कृतज्ञता गौरव सन्मान’ सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय जाधव यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची जपणूक करत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. श्रीमती कैलासबेन रावळ यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन श्री. विजय जाधव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अमृतदादा रावळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण वारसा जपण्याचे आवाहन केले.

समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही प्रेरणादायी परंपरा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.सन्मान स्वीकारल्यानंतर श्री. विजय जाधव यांनी हा पुरस्कार आपल्या पत्रकारितेतील जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असून, समाजहितासाठी निःपक्षपाती व सकारात्मक पत्रकारिता करण्याचा संकल्प कायम ठेवणार असल्याची भावना व्यक्त केली.हा गौरव सोहळा शर:भ्रम विकास प्रतिष्ठान, भोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, उपस्थितांनी सन्मानित व्यक्तींचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



