प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
भोर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याची शपथभूमी म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र रायरेश्वर येथे अरण्य षष्ठी व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी प्लास्टिक स्वच्छता मोहीम व निसर्ग परिचय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत मंदिर ते शिडीमार्ग परिसरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.बायोस्फिअर्स संस्था, पुणे; श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था; मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); पुणे वनविभाग (प्रा.), भोर; सह्याद्री रेस्क्यू फोर्स तसेच रायरेश्वर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.रायरेश्वर पठारावरील वाढते प्लास्टिक प्रदूषण, पर्यटकांकडून टाकला जाणारा कचरा आणि त्यामुळे स्थानिक जैवविविधतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टिक पेले, शीतपेयांच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, प्लास्टिक पिशव्या आदी कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे.अरण्य षष्ठी हा निसर्गसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा सण मानला जातो. या निमित्ताने रायरेश्वर परिसरातील अरण्य व देवराई स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच श्री रायरेश्वर जलाभिषेक, जनाई देवीची पूजा, ओटी भरणे आणि देशी वृक्षांचे रोपण यांसारखे उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.या मोहिमेद्वारे पर्यटक व भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, निसर्गात कचरा न टाकता पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या अनोख्या व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.उपक्रमाबाबत
अधिक माहितीसाठी डॉ. सचिन पुणेकर (९५०३०९६४६९), दत्तात्रय जंगम (९२२१७९९९६७), सचिन देशमुख (९२७२७१८००८), राजेश महांगरे (९९२३९७७९७९), संदीप जंगम (७२१८४९०३९१) आणि दत्तात्रय गायकवाड (९९२२१०२१३७) यांच्याशी संपर्क साधावा.



