प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
शिरूर, प्रतिनिधी : शिरूर शहरातील संभाजीनगर (हुडको कॉलनी) येथील सी. टी. बोरा कॉलेज रोड परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिसरातील स्थानिक नागरिकांनी ही समस्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद व जनसेवक अविनाश घोगरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
समस्येची माहिती मिळताच सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पाहणीदरम्यान पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरता मार्ग उपलब्ध होऊ शकतो, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः हातात टिकाव घेऊन खोदकामाच्या कामात सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीत तातडीने खोदकाम करून पाण्याचा निचरा करण्यात आला. त्यामुळे साचलेले पाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा झाला आणि परिसरातील नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला.
यानंतर या समस्येची माहिती नगराध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई पाचरणे यांना देण्यात आली. त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला तातडीच्या सूचना देत या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय कायमची दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.या कार्यवाहीवेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद, जनसेवक अविनाश घोगरे तसेच परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून हातात टिकाव घेऊन समस्येच्या निवारणासाठी केलेल्या कार्यतत्परतेचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. तसेच जनसेवक अविनाश घोगरे यांनी स्थानिक नागरिकांसह समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. नगराध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई पाचरणे यांनी समस्येची त्वरित दखल घेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
नगराध्यक्ष, सभापती आणि जनसेवक यांच्या समन्वयातून झालेल्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची कार्यपद्धती इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याच्या भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.



